बीड : निलंबित पीएसआय रणजित कासले याला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला त्याला बीड तुरुंगात ठेवले होते. पुढे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला संभाजीनगर येथील तुरुंगात हलवण्यात आले.
आता कासले हा तुरुंगातून बाहेर आला आहे. त्यानंतर त्याने व्हीडीओ करत बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केला आहे.
कासले म्हणाला, ‘मी बीडच्या तुरुंगात गेलो तर पाहिले की खास कपात वाल्मिक कराडला चहा दिला जातो. बाकीच्यांना प्लास्टिकचे कप आहेत. वाल्मिक कराडला पांघरण्यासाठी सहा ब्लँकेट दिले आहेत. त्या ब्लँकेटची गादी करून तो त्यावर आराम करतो. रोज त्याला वाचण्यासाठी सहा सहा पेपर आहेत. खायला चिकन मिळते. वाल्मिक कराडसाठी बीड जेल म्हणजे स्वर्ग आहे.
कासले म्हणाला की, ‘मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा विचारले की वाल्मिक कराड कुठे आहे. तर मला काही जणांनी दाखवले कराडची बराक कोणती आहे. साडेचार वाजता कराडसाठी चहा आला.
बाकीच्यांना प्लास्टिकच्या कपातून तर कराडसाठी नवीन कपातून चहा दिला जात होता. त्याला तीन लेअरच्या तेल लावलेल्या चपात्या देखील मिळत होत्या. बाकीच्यांना एक हजाराची कॅन्टीन मिळत नाही. मात्र, कराडला २५-५० हजारांची कॅन्टीन मिळते. तो दुस-या कैद्यांच्या नावाने कॅन्टीन घेतो. त्यांची नावे देखील मी सांगू शकतो.
बीड जेलमध्ये मी जाताच वाल्मिक कराडने तिथल्या तुरुंग अधिका-यांना बोलावून रणजित कासलेला येथून हलवा असे सांगितले. त्यामुळे सुरक्षेचे कारण देत मला संभाजीनगरच्या जेलमध्ये हलवण्यात आले, असे रणजित कासले याने सांगितले. मी जेलमध्ये असताना माझ्यावर कोणता हल्ला होणार होता त्यामुळे मला हलवण्यात आले, असा प्रश्न देखील कासले याने केला आहे.
वाल्मिकला नागपूरच्या जेलमध्ये न्या…
कासले म्हणाला, बीडचा तुरुंग हा वाल्मिक कराडसाठी स्वर्ग आहे. धनंजय मुंडेंनी त्याला शब्द दिलाय की केस चार-पाच वर्षे चालेल त्यामुळे तुला बीडच्याच जेलमध्ये ठेवू. त्यामुळे मराठा बांधवांनी मागणी करावी की वाल्मिक कराडला नागपूरच्या, संभाजीनगरच्या किंवा कोल्हापूरच्या जेलमध्ये हलवावे. मी देखील अर्ज केला होती की त्याला दुसरीकडे हलवा.