सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानानंतर बोरामणी विमानतळाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या विमानतळासाठी अत्यावश्यक ३३.७२ हेक्टरचे भूसंपादन अजूनही प्रलंबित आहे. भूसंपादनाचा विषय पाच वर्षांपूर्वी केंद्रीय समितीकडे गेला होता. यावर अजूनही निर्णय झालेला नाही.
बोरामणी विमानतळाचा प्रकल्प मी मंजूर केला. भले माझ्या नावाचा फलक कचऱ्याच्या डब्यात टाका. मात्र, हा प्रकल्प सुरू करा, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते.
बोरामणी विमानतळ २००८ मध्ये मंजूर झाले. २००९ साली भूसंपादनाला सुरुवात झाली. बोरामणी आणि परिसरातील ५७५ हेक्टर जमीन संपादित झाली. यासाठी सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. एकूण भूसंपादनापैकी ३३.७२ हेक्टर जमिनीचे अद्यापही भूसंपादन झालेले नाही. ही वन जमीन आहे.
या जमिनीवर दुर्मीळ माळढोक पक्षाचा अधिवास असल्याचे उपवनसंरक्षक कार्यालयाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ३३ हेक्टर वन जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव नागपूरच्या वनसंरक्षक कार्यालयाला पाठविला होता. तिथून हा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे गेला.केंद्रीय समितीने २०२० मध्ये माळढोकच्या अधिवासाचे कारण देउन हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावर पुनर्विचार प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विमानतळ विकास कंपनीच्या ताब्यात ५७५ हेक्टर जमीन आहे. मात्र, रनवेसाठी आवश्यक असलेली ३३ हेक्टर जमीन मिळालेली नाही. वन जमिनीच्या बदल्यात जिल्हा प्रशासन इतरत्र वन जमीन देऊ शकते, मात्र या जागेवर माळढोकचा अनेक वर्षांचा अधिवास असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. ही अधिवासाची जागा सहजासहजी बदलता येणार नाही. हा सर्व गोंधळ विमानतळाच्या भूसंपादनाचा आराखडा तयार करणाऱ्या तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांमुळे निर्माण झाल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या २०२३ मध्ये झालेल्या एका सभेत माळढोकच्या अस्तित्वाचे पुरावे छायाचित्रांसह सर्व आमदार आणि खासदारांना दाखवले होते. त्यामुळे जमीन संपादनाचा विषय कठीण झाला आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय विमान मंत्र्यांकडे हा प्रकल्प मार्गी लावण्याचे निवेदन दोनवेळा दिले. मात्र, त्यावरही मंत्रालयाकडून कार्यवाही झालेली नाही.होटगी रोड विमानतळ हे शहराच्या
मध्यवर्ती भागात आहे. विमानतळाच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे.त्यामुळे या विमानतळाला मर्यादा असल्याने बोरामणी विमानतळाच्या कामाला गती मीळणे गरजेचे आहे.