25.8 C
Latur
Sunday, September 21, 2025
Homeराष्ट्रीयमतचोरीचे १०० टक्के पुरावे

मतचोरीचे १०० टक्के पुरावे

हायड्रोजन बॉम्ब फोडणारच, राहुल गांधी यांचा इशारा
वायनाड : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतचोरीवरून सडकून प्रहार करताना गर्भित इशारा दिला. माझ्याकडे मतचोरीचे पुरावे असून ते लवकरच जाहीर केले जातील. त्यानंतर मोदींनी मतचोरी करून सत्ता मिळवली, यावर कोणीही शंका घेणार नाही. आमच्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. लवकरच आम्ही एक हायड्रोजन बॉम्ब फोडू. आम्ही पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. यासंबंधी आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

केरळमधील वायनाडमध्ये ते बोलत होते. मागील पत्रकार परिषदेत काँग्रेसने मतदार यादीतील हेराफेरीची उदाहरणे दिली होती. महादेवपुरा आणि अलांदमध्ये चुकीच्या पद्धतीने मते जोडण्याच्या आणि वगळण्याच्या घटना दाखवण्यात आल्या. राहुल गांधी यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मत चोरांना संरक्षण देत आहेत. अलांद विधानसभा मतदारसंघातील ६ हजार मतदारांची नावे वगळण्याच्या प्रयत्नाचे प्रकरण सीआयडी चौकशीत आहे. ही चौकशीच सीईसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

मी देशासमोर सत्य आणेन. पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीशी त्यांचा हायड्रोजन बॉम्ब जोडला गेला आहे का, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, अनुमान लावणे हे माध्यमांचे काम आहे. माझे काम देशासमोर सत्य आणणे आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले. कोणताही सामान्य नागरिक ऑनलाइन कोणाचेही मत वगळू शकत नाही. एखाद्याचे मत वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

पंतप्रधान कमकुवत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसासाठी वार्षिक शुल्क अंदाजे ८८ लाखांपर्यंत वाढवले ​​आहे. एच-१ बी व्हिसा शुल्क वाढीमुळे भारतीयांना सर्वाधिक दणका बसला. यावर राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान कमकुवत आहेत. मी या अगोदरच हा मुद्दा मांडला होता. याबाबत ते काहीही बोलू शकत नाहीत, असे सांगत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR