मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या ‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात सोमवारी रात्री दोन साप आढळले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास साप फिरत असल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना फोनवरून मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच विक्की दुबे घटनास्थळी दाखल झाले. मन्नत बंगल्याच्या पटांगणात एका शिडीखाली पाहणी केली असता धामण जातीचा सुमारे आठ फूट लांबीचा बिनविषारी साप आढळून आला. हा साप वेटोळे घालून बसला होता. सर्पमित्र विक्की यांनी त्याला कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू केले. मात्र परिसरात लोकांची चाहूल लागताच दुसरा साप तिथून निसटून गेला. हा दुसरा साप कुठे गेला, याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र बराच शोध घेतल्यानंतरही तो साप आढळून आला नाही.
मन्नत बंगल्याच्या परिसरात दोन साप आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षारक्षक आणि बंगल्यातील लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रेस्क्यू करण्यात आलेला साप बिनविषारी धामण असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सापाला रेस्क्यू केल्यानंतर सर्पमित्रांनी उपस्थितांना सापाबाबत माहिती देत घाबरण्याचे कोणतंही कारण नसल्याचे सांगितले. धामण हा बिनविषारी साप असून तो प्रामुख्याने उंदीर, बेडूक यांसारख्या प्राण्यांवर उपजीविका करतो. त्यामुळे मानवी वस्तींमध्ये तो आढळला तरी त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षितपणे रेस्क्यू करणे महत्त्वाचे आहे.
















