मुंबई : दीपक केसरकर यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही निर्णय जाहीर केले आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मराठी भाषा येत असेल तरच महाराष्ट्रात वाहन चालक परवाना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच मराठी भाषेला सर्व व्यवहारात प्राधान्य देणार असल्याचेही ते म्हणाले.
सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी विशेष योजना राबविणार, सर्वसमावेशक असे शासनाचे मराठी भाषा धोरण तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्रातील वाचनालयांना शासन मदत करणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने फक्त शिक्षणाचेच नव्हे तर लोकव्यवहाराचे जास्तीत जास्त मराठीकरण होण्याची गरज आहे. त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व स्तरांवरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर व्हायला हवा. या अनुषंगाने मराठी भाषा धोरण तयार करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. या धोरणाविषयीची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी काल दिली होती.