मुंबई : विशेष प्रतिनिधी
एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली असताना काँग्रेस प्रदेशाध्ययक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य करत एक्झिट पोलचे अंदाज खोडून काढले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्तही त्यांनी यावेळी सांगितला आहे.
शक्यतो उद्या संध्याकाळी आम्ही सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार आहोत. वेळ कमी असल्यामुळे सगळ्या आमदारांना बोलावण्यासाठी आणि लवकरात लवकर आणण्यासाठी फ्लाईट आणि इतर सगळी जुळवाजुळव करीत आहोत. आम्हाला बहुमत मिळेल आणि आम्ही अपक्ष उमेदवारांसह बंडखोरांच्याही संपर्कात आहोत.असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
शरद पवार यांची ऑनलाईन बैठक
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं? हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात? मतमोजणी संपताना सी-१७ फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. या बैठकीत महाविकास आघाडी १५७ जागांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली.