नांदेड : प्रतिनिधी
अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या पावसाळ्याला सुरुवातीपासूनच विलंब झाला. पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्याही उशिरा झाल्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात अचानक पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम पुन्हा संकटात सापडला. तब्बल महिनाभर पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत सोयाबीन, कापूस यांसह अन्य पिकांवर मोठा परिणाम झाला.
दरम्यान, हवामान केंद्राने दिलेल्या येलो अलर्टनूसार गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, शनिवारी नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना विलंब झाला. जुलैमध्ये पावसाने जोर धरल्यानंतर शेतक-यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांची पेरणी केली. पिकांची उगवण झाल्यानंतर सुरुवातीला समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळेनासा झाला. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली. विशेषत: सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाच्या दीर्घ खंडाचा फटका बसला. काही ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत पोहोचल्याने शेतक-यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली.
















