माढा: सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या तालुक्यांपैकी एक तालुका म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यात द्राक्षपाठोपाठ केळी आणि डाळिंब लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून आंबा आणि पेरुच्या फळबागा विकसित होत आहेत.
राज्यातील प्रमुख दुष्काळी तालुक्यापैकी एक तालुका म्हणून माढा तालुक्याची ओळख होती. परंतु, भीमा-सीना जोड कालवा, सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रामुख्याने सीना नदीच्या काठचा परिसर आणि तालुक्याच्या मध्य भागातील काही भाग ओलिताखाली आला आणि हा भाग तालुक्यातील ऊस उत्पादक भाग बनला आहे. यातून साखर कारखानदारी विकसित झाली आणि या माध्यमातून यापरिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले. परंतु, उर्वरित भागाचे काय? असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तालुक्याचा पूर्व भाग हा सिंचन सुविधांचा अभाव असलेला आणि कमी पाण्याचा भाग म्हणून ओळखला जातो. यामुळे येथे स्थलांतरित होणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत चालले. यातच कमी पाण्यावर द्राक्ष शेती होऊ शकते, हे या भागातील शेतकऱ्यांनी सिध्द केले आहे. यातून तालुक्यातील दुष्काळी भागात द्राक्ष शेती वाढत गेली.
सध्या द्राक्ष, केळी आणि डाळिंब पिकातून सर्वाधिक चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी वर्गाकडून होत आहे यातून कृषिनिष्ठ परिवाराची निर्मिती झाली. यामध्ये एक मोठी अशा शेतकऱ्यांची साखळी तयार झाली असून या शेतकऱ्यांमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट असे उत्पादन घेण्याची स्पर्धादेखील येथे पहावयास मिळते. हे आणखी महत्त्वाचे मानले जाते आहे. फळशेतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले प्रभुत्व सिध्द केले आहे.
तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली आहे तर डाळिंब दोन हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले आहे. केळीचे जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसते आहे. या खालोखाल आंबा, पेरू, बोरे आदी फळपिके घेतली जात आहेत.
फळपिकांच्या बाबतीत अनेकांनी परदेशी बाजारपेठेत आपल्या मालाला गिऱ्हाईक शोधले आहे तर काहींनी देशांतर्गत बाजारपेठेत आपले नावास महत्त्व प्राप्त केले आहे. यामध्ये खैरावचे ब्रह्मदेव शेळके, पिंपळनेरचे विक्रम फुगे, शिराळचे नागन्नाथ शिंदे, उपळाई खुर्दचे प्रकाश कुलकर्णी, करकंबचे विठ्ठल माने, पिंपळखुंट्याचे नाना नवगिरे, टेंभुर्णीचे अमित देशमुख असे अनेक शेतकरी आहेत. ज्यांनी फळपिकांबरोबरच विविध प्रयोगदेखील करण्याचे काम सुरू केले आहे.