मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे भोवले. दळवी यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, दळवींवर कारवाई केल्यानंतर सायंकाळी अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात आता वादाची ठिणगी पडली असून, यावरून दोन गटात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार प्रवीण राऊत भांडुप पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी थेट पोलिसांना जाब विचारला. दरम्यान, भांडुप पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दळवी यांनी रविवारी झालेल्या कोकणवासीयांच्या मेळाव्यात शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
घरात घुसून गाड्या फोडल्या
दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केल्यानंतर सायंकाळी अज्ञातांनी दळवी यांच्या घरात घुसून गाड्यांची तोडफोड केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.