लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात मोटार अपघात नुकसान भरपाईच्या दाव्यात ऐतिहासिक तडजोड झाली असून तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे टाटा ए. आय. जी. इन्शुरन्स कंपनीने मान्य केले आहे. लातूर जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील ही सर्वाधिक नुकसान भरपाईची रक्कम असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयामुळे दिवंगत न्यायाधीशांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही काळापूर्वी दिवंगत न्यायाधीश स्व. उद्धव पाटील यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कायदेशीर वारसांतर्फे नियमानुसार मोटार अपघात नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेत न अडकता पीडित कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई मिळावी या उद्देशाने सर्व संबंधितांनी सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.
या प्रकरणात लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका, जिल्हा न्यायाधीश राहुल भागवत, जिल्हा न्यायाधीश सतीश पाटील आणि तदर्थ जिल्हा न्यायाधीश फैजुद्दीन शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. शिवकुमार जाधव, उपाध्यक्ष अॅड. लहू चामे, सचिव अॅड. गुरुप्रसाद येरटे, सहसचिव अॅड. सिद्धेश्वर धायगुडे आणि अॅड. श्रद्धा पाटील यांनीही मध्यस्थीसाठी सहकार्य केले. तसेच विमा कंपनीचे विधी सल्लागार अॅड. सुरेशराव डुईजोडे यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मुख्य दालनात आयोजित विशेष कार्यक्रमात दिवंगत न्यायाधीश स्व. उद्धव पाटील यांच्या कायदेशीर वारसांना २ कोटी ९० लाख रुपयांचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
















