तिरुवनंतपुरम : सलामीवीर यशस्वी जैस्वालने केलेल्या पॉवरप्लेमधील तुफानी धुलाईनंतर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशानच्या शानदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढली. टॉप ३ फलंदाजांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीने ऑस्ट्रेलियासमोर दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाने २३६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा सामना करताना ऑस्ट्रेलियानेही आक्रमक सुरुवात केली. परंतु ठराविक टप्प्यांत गडी बाद होत असल्याने निर्धारित षटकांत ऑस्ट्रेलियाला ९ बाद १९१ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी पराभव झाला. ५ सामन्याच्या मालिकेत आता भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.
तिरुवनंतपुरम येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या टी-ट्वेंटी सामन्यात पहिल्या सामन्यात मिळवलेली लय कायम ठेवली. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने २० षटकात ४ विकेट गमावत २३५ धावा केल्या. ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने ५३, इशान किशनने ५२ आणि ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ५८ धावा केल्या. या तिघांचे वेगवान अर्धशतक आणि शेवटी रिंकू सिंगने ३५० च्या स्ट्राईक रेटने आपली स्फोटक फलंदाजी करीत ९ चेंडूत २९ धावा ठोकल्या. याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात कांगारू निर्धारित २० षटकांत ९ गडी बाद १९१ धावांच करू शकले. त्यामुळे ऑस्ट्रोलियाचा ४४ धावांनी पराभव झाला. या सामन्यात प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.