बारामती : प्रतिनिधी
लोकसभेनंतर आता पुन्हा एकदा बारामती मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे विधानसभेसाठी काकांच्या विरोधातच शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे कधीही झुकला नाही, ना यापुढे झुकेल, असे म्हणत आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघात ‘स्वाभिमान यात्रा’ सुरू केली आहे.
राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत संसार थाटल्याने बारामतीचे सारे गणिते बदलून गेली आहेत. एरवी बारामतीतून दीड लाखांनी निवडून येणारे अजित पवार निवडणुकीला उभे राहावे की नाही याबद्दल साशंकता व्यक्त करतायेत. दुसरीकडे दादांना कुटुंबातूनच आव्हान देऊन विधानसभेची लढाई जिंकण्याची रणनीती त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार करत आहेत. त्यामुळे आता जर विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली तर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.