25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीययुद्धाची आग उडविणार जगभर तेलाचा भडका!

युद्धाची आग उडविणार जगभर तेलाचा भडका!

आगीत तेल । तेल उत्पादकांच्या नफेखोरीमुळे किमतीत सतत कृत्रिम फुगवटा; साठवणूक क्षमतेच्या अभावामुळे भारतीय ग्राहकांना फटका

तेहरान : वृत्तसंस्था
आखातामधील तणावामुळे जगभरात तेल आणि गॅस पुरवठ्याचे संकट गडद होताना दिसत आहे. फेब्रुवारी २०२२ नंतर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत वाढण्याचा जो प्रवाह सुरु झाला तो अद्यापही सुरूच आहे.

ज्यावेळी इंधनाच्या दरात भरीव वाढ होते तेव्हा देशातील सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. जगातील बहुसंख्य देशांच्या तुलनेत भारतात मात्र तेलाच्या किमती नेहमीच अधिक असतात. सर्वसाधारण परिस्थितीत जागतिक बाजारातील दर पाहता भारतामध्ये पेट्रोल हे ५० ते ५५ रुपयांनी नागरिकांना मिळायला हवे; पण तसे होत नाही.

२०२२ पासून भारताच्या तेल आयातीत एक नवा प्रवाह दिसून येत आहे. भारताने आपल्या तेल आयातीत मोठी विविधता आणली आहे. आखात, अमेरिका यांच्यावर फार विसंबून राहणे आता भारताने थांबवले आहे. भारताला तेलासाठी आता रशियाचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. आजही भारत आपल्या एकूण गरजेच्या २८% गरज राशियाकडून भागवतो. रशिया भारताच्या पहिल्या ५ तेलपुरवठादार देशांपैकी एक आहे.

भारत आणि चीन हे आशिया खंडातील दोन बडे देश ओपेक राष्ट्रांवर कच्च्या तेलाबाबत बव्हंशी निर्भर आहेत. भारताचा विचार करता आपल्या एकूण तेलगरजेपैकी ८० टक्के कच्चे तेल आपण आयात करतो. सौदी अरेबिया हा भारताचा सर्वांत मोठा तेलपुरवठादार देश आहे. या पाठोपाठ इराक आणि इराणचा क्रमांक लागतो. पण इराणकडून भारताने तेलआयात पूर्णत: थांबवली आहे. त्याऐवजी भारत आता एकूण गरजेच्या ५ टक्के तेल अमेरिकेकडून डब्ल्यूटीआयच्या रुपाने आयात करतो.

तथापि, भारताची तेलसाठवणूक क्षमता खूप कमी आहे. साधारणत: ४२ दिवस पुरेल इतकेच इंधन साठवण्याची आपली क्षमता आहे. भारताने याबाबत यापूर्वीच वेगाने पावले टाकली असती तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या दरांमधील चढउतारांचा फारसा परिणाम आपल्याला सोसावा लागला नसता.
चौकट
नफेखोरीमुळे दरात कृत्रिम फुगवटा
अलिकडच्या काळात तेलाच्या किमतीत होत असलेली वाढ हा कृत्रिम फुगवटा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तेलउत्पादक देशांचे नफेखोरीचे राजकारण हे यामागील प्रमुख कारण आहे. साधारणत: तेलाबाबत दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ब्रेंट आणि दुसरा म्हणजे डब्ल्यूटीआय (वेस्ट टेक्सास इंटरमीजियेट). ‘ओपेक’ म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्ट कंट्रीज या गटामध्ये मध्य आशिया तसेच आफ्रिकन देशांचा म्हणजेच आखाताचा समावेश होतो. या देशांकडून जे कच्च्या तेलाचे उत्पादन केले जाते ते ब्रेंट ऑईल म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये वापरण्यात येणारे पेट्रोल-डिझेल हे ब्रेंट ऑईलपासून तयार केले जाते. सध्या होत असलेली दरवाढ ही बे्रंट ऑईलमध्ये झालेली आहे. काही वर्षांपूर्वी डब्ल्यूटीआयच्या दरांमध्येही ऐतिहासिक वाढ झाली होती. यामागेही नफेखोरीचेच कारण होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR