नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा रॅँक पटकावला असून पुण्याच्या अर्चित डोंगरे राज्यात पहिला आणि देशात तिसरा ठरला. प्रयागराजची शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या पाचमध्ये आलेल्या तीन महिला उमेदवार आहेत.
नागरी सेवा परीक्षा २०२४ अंतर्गत, यूपीएससीने आयएएस, आयपीएससह सेवांमध्ये ११३२ पदांसाठी अर्ज मागवले होते. पूर्वी मूळ अधिसूचनेतही फक्त १०५६ रिक्त जागा होत्या पण नंतर त्या ११३२ पर्यंत वाढवण्यात आल्या. त्यानंतर निकालात एकूण १००९ उमेदवारांना यश मिळालं आहे. त्यापैकी ३३५ उमेदवार सामान्य श्रेणीतील आहेत. १०९ जण ईडब्ल्यूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी आणि ८७ एसटी प्रवर्गातील आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. १७ एप्रिल २०२५ पर्यंत युपीएससी परीक्षेच्या मुलाखती सुरु होत्या. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सुमारे २८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला.
संभाजीनगरच्या तेजस्वीला ९९ वा रॅँक
संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात ९९ वा क्रमांक मिळवला आहे. तेजस्वी हिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नाथ व्हॅली स्कूलमध्ये पूर्ण केलं. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली आणि तिने लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच तिच्या मनात यूपीएससीची तयारी करण्याची ठाम इच्छा निर्माण झाली आणि तिने दिल्लीमध्येच राहून अभ्यास सुरू केला.