व्हिएन्ना : वृत्तसंस्था
युरोप राष्ट्रवादाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. गेल्या पाच वर्षांत येथे उजव्या विचारांच्या राजकीय पक्षांनी सात देशांत सत्ता मिळवली. त्या आधी मात्र युरोपातील कोणत्याही देशात उजव्या विचारांच्या पक्षांकडे सत्तेची सूत्रे नव्हती. सध्या इटली, फिनलँड, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, नेदरलँड्समध्ये राष्ट्रवादी सरकार सत्तेवर दिसत आहे.
या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रियात होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी फ्रीडम पार्टी विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. पाहणीनुसार फ्रीडम पार्टीला सुमारे २७ टक्के मते मिळू शकतात. खरे तर युरोपातील निवडक तटस्थ देशांत ऑस्ट्रियाची गणना होते. ७० वर्षांपासून तटस्थ राहिलेल्या ऑस्ट्रियात उजव्या विचारांच्या पक्षांचा उदय झाल्याने सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
यंदा ऑस्ट्रियासह युरोपातील ९ देशांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रियात २९ सप्टेंबरला मतदान होईल. झेक गणराज्यात सप्टेंबरमध्येच निवडणूक आहे. ऑक्टोबरमध्ये बोस्रिया, बल्गेरिया, जॉर्जिया, लिथुवेनिया, मॉल्डोवामध्ये तर क्रोएशिया आणि पूर्व युरोपातील सर्वात महत्त्वाच्या रोमानियामध्ये डिसेंबरमध्ये निवडणूक होईल.
ब्रिटन : पहिल्यांदाच उजव्या विचारांचे प्रतिनिधित्व
युरोपात केवळ ब्रिटन राष्ट्रवादी पक्षांच्या आघाडीपासून दूर राहिले. परंतु जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी इंडिपेंडन्स पार्टीने (यूकेआयपी)१३ टक्के मते मिळवली. गेल्या निवडणुकीत या पक्षाला केवळ ३ टक्के मते मिळाली होती. पक्षाचे संस्थापक निगेल फरेज खासदार म्हणून निवडून आले. ब्रिटनमध्ये समाजवादी विचारांचा मजूर पक्ष व मध्यममार्गी हुजूर पक्षाची आलटून-पालटून सत्ता राहिली आहे.
राष्ट्रवादी पक्षांना स्थलांतरितांचे समर्थन
युरोपात स्थलांतरितांचे लोंढे हा मोठा प्रश्न आहे. इटलीत जॉर्जिया मेलोनी यांनी याच कळीच्या मुद्यावर निवडणूक ज्ािंकली. त्या पंतप्रधान आहेत. राष्ट्रवादी पक्ष अशा स्थलांतरितांना देशात प्रवेश देण्यास मनाई करतात. अलीकडेच जर्मनीतील दोन राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी एएफडीने (अल्टरनेटिव्ह फरॅर जर्मनी) आश्चर्यकारक कामगिरी केली. एकेकाळी डाव्याचा किल्ला मानल्या जाण-या थुरिंजियामध्ये एएफडीने विजय मिळवला. सॅक्सोनी या प्रांतातही आघाडी घेतली.