जालना : महाविकास आघाडीची सत्ता आली तर ते तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देतील, असे त्यांच्याकडून लिहून घ्या, असे आव्हान महायुतीमधील नेते देत होते. महायुती सरकारने नुकताच १५ जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याची शिफारस केली. त्यामध्ये मराठा समाज नसल्याने मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत? आता या जातींना विरोध का नाही? की त्यांना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतले.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, १५ जातींचा ओबीसीत समावेश करताना आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही का? छाती बडवून घेणारा तो येवल्याचा नेता कुठे गेला? मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीयवाद कशासाठी? मराठ्यांची फसवणूक केली जात आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
मागच्या दोन महिन्यांपासून सरकार छोट्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करणार आहे, हे आम्हाला माहीत होते. पोटजाती म्हणून तुम्ही समावेश केला. मग मराठा-कुणबी एक असताना का नाही समावेश केला, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.