नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशियाकडून केली जाणारी तेल खरेदी कमी करून अमेरिकेकडून वाढवावी, यासाठी भारताला दिलेल्या प्रस्तावामुळे फेब्रुवारी महिन्यात रशियाकडून होणा-या तेलाच्या आयातीत २५ टक्क्यांनी कपात झाली. तर, अमेरिकेडून होणा-या इंधन आयातीत १०० टक्के वाढ झाली. अमेरिकडून २५ अब्ज डॉलरच्या ऊर्जा खरेदीला दिलेल्या मान्यतेचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
रशियाच्या अर्थव्यवस्थेत इंधन तेलाची निर्यात हा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यावर युक्रेनच्या युद्धानंतर कु-हाड चालवण्याचा प्रयत्न अमेरिकेने चालवला होता. मात्र, रशिया डॉलरऐवजी रुपया या चलनात इंधन विक्री करण्यास तयार झाला. त्यामुळे रशिया भारताचा मुख्य पुरवठादार बनला होता. भारतात रशियाकडून होणारी इंधन तेलाची आयात जानेवारी महिन्यात १४ लाख बॅरल प्रतिदिन इतकी होती, ती घटून १ फेब्रुवारीपासून १० लाख ७० हजार बॅरल (प्रतिदिन) इतकी झाली. तर, अमेरिकेकडून होणारी आयात १ लाख १० हजार बॅरल प्रतिदिन होती, ती २ लाख बॅरल प्रतिदिन इतकी झाली असल्याचे ‘एनर्जी कार्गो ट्रॅकर व्होर्टेक्सा’च्या अहवालात म्हटले आहे.
भारतात सौदी अरेबियाकडून होणा-या तेल आयातीत ७ लाख ७० हजार बॅरल प्रतिदिनवरून ९ लाख १० हजार बॅरल प्रतिदिन इतकी वाढ झाली आहे. संयुक्त अरब अमिरातकडून होणारी तेल आयात ४ लाख ८० हजार बॅरलवरून ३ लाख १० हजार बॅरल प्रतिदिन इतकी कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
शुद्धीकरण कंपन्यांचा रशियन तेलास विरोध
भारतातील तेलशुद्धीकरण कंपन्याही अमेरिकी निर्बंधांच्या भीतीने रशियन पुरवठ्याऐवजी अमेरिका, मध्य पूर्वेतील देशांना पसंती देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर अमेरिकेकडून ऊर्जा खरेदी लक्षणीय वाढवण्याचे मान्य करण्यात आल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले. याशिवाय रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास अमेरिकेकडून या कंपन्यांवर अधिक निर्बंध लादले जातील, अशी भीती तेलशुद्धीकरण कंपन्यांना आहे.