मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कडक उन्हाने ग्रासला आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २ ते ३ दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्यात पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवेच्या कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उन्हाचा कडाका पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागातील तापमान ४५अंशांच्या वर गेले आहे. अशामध्ये पुढील काही तासांत हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत (२९ एप्रिल) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज वर्तविला आहे. तसेच, राज्यात १ मे आधी पुन्हा पश्चिमेकडील वारे सक्रिय होत आहेत. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असून मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ अंशांपर्यंत जाणार घटणार आहे. मराठवाड्यात तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहणार असून खान्देश आणि विदर्भात तापमान ४० पर्यंत घसरण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली आहे.
उकाड्याने हैराण
सध्या राज्यातील वाढत्या तापमानाचा मोठा फटका हा दैनंदिन जीवनात पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती आणि अकोला येथे झाली, तर मुंबईत ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. अशामध्ये सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघात व्यवस्थापन कक्ष स्थापन करा, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेने कहर केला असून उष्णतेपासून संरक्षणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी नवे दिशानिर्देश जारी केले आहे.
काय आहेत केंद्राच्या सूचना
दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे
घरे थंड ठेवावीत, या काळात पुरेसे पाणी, द्रवपदार्थ यांचे सेवन करावे
हलके, सैल कपडे घालावे
लहान मुले, पाळीव प्राण्यांना वाहनांमध्ये एकटे सोडू नये.

