मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या १० जागांवरील निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. सध्या बच्चू कडू यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून याबाबत ते २९ एप्रिलला आपली भूमिका जाहीर करतील, अशी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. याचदरम्यान, बच्चू कडू यांच्या पक्षाकडून विदर्भातील पक्षाचे सर्व अधिकार आणि मंत्रिपदाची मागणी करण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे. पण, बच्चू कडू यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना ते शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तरी स्वत:चा पक्ष विलीन करायचा की स्वतंत्र ओळख कायम ठेवायची, हा सवाल त्यांच्यासमोर असल्याचे कळते.
प्रहार जनशक्ती संघटनेचे विलीनीकरण झाले, तर शिवसेनेला त्याचा थेट राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात खासकरून विदर्भ भागात बच्चू कडू यांचा प्रभाव आहे. या भागात सध्या भाजप आणि काँग्रेसचे वर्चस्व असले, तरी बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नवी ताकद मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय फक्त एका नेत्यापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण प्रादेशिक राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो.
विधान परिषदेच्या निवडणुकीत २ जागा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. अशामध्ये या जागांपैकी एका जागेवर बच्चू कडू यांना पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चेनंतर त्यांना उमेदवारी देण्यावरून शिवसेनेत एकमत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात प्रहार पक्षाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये काय निर्णय होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, बुधवारी (२९ एप्रिल) बच्चू कडू काय घोषणा करणार? याकडे आता सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

