पुणे : प्रतिनिधी
ऑक्टोबर हीटमुळे उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असतानाच एकाएकी राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २४ तासांमध्ये पावसाने क्षणिक उघडीप दिली असली तरीही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा राज्यावर काळ्या ढगांचे सावट पाहायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे एक तीव्र क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असल्यामुळे पुढील तीन दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय राज्याच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर जास्त राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात मंगळवारपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची वाटचाल वायव्य दिशेने होताना दिसत आहे. येत्या काळात हे वारे आणखी तीव्र होणार असून, अरबी समुद्रात त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र अधिक प्रभावी राहणार आहे.
सतत वातावरणात बदल
मुंबईपासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र इथे राहणार आहे. ज्यामुळे पावसाने अद्यापही पाठ सोडलीच नाही असे म्हणणे गैर ठरणार नाही. सकाळ-दुपारी उन्हाचा तडाखा आणि सूर्य मावळतीला जाताना सुटणारा सोसाट्याचा वारा, त्यासह येणारा वादळी पाऊस या विचित्र हवामानामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.