मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली. याद्वारे राज्यातील महिलांना महिन्याता १५०० रुपये मिळणार आहेत. तर या रक्षांबधनाला दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना ही योजना लागू केल्याचा आरोप विरोधकांनी केला. वित्त विभागाने देखील यावर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान ठाकरे गटाने आता मोठा दावा केला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे निधी नसल्याने सरकारी कंत्राटदारांची चारशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची बिले सरकारने थकवली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांनी मंत्रालयावर धडक दिली. सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी दिला जाईल, तोपर्यंत बिलांची रक्कम मागू नका, अशी भूमिका घेतल्याचे ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्रात म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागावर परिणाम-
लाडकी बहीण योजनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला फटका बसला आहे, असा ठाकरे गटाच्या मुखपत्रात दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या दालनाचे नूतनीकरण केले, याचे पैसे थकल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.
कंत्राटदारांचे आंदोलन
काल कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांच्या दालनात धडक दिली. त्यांना रक्षाबंधन झाल्यानंतर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. वित्त विभागाने सर्व कामांच्या निधीच्या फाईल्स थांबवल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊतांची प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या योजनेत फसवणूक असून निवडणुकीचे दोन महिने आहेत, त्यानंतर लाडकी बहिणीला काही मिळणार नाही, असे म्हटले आहे.
विरोधी पक्षाचे आरोप-
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर आरोप केले की, निवडणुकांपुरता हा लाडकी बहिणीचा उमाळा आहे. त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांमध्ये त्यांच्या खात्यात पैसे टाकतील आणि महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर करतील, मग त्यानंतर पळून जातील