मालेगाव : प्रतिनिधी
एकीकडे राज्य सरकार ‘लाडकी बहीण’सारख्या योजना राबवत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचा पोषण आहार, गणवेश याकडे मात्र कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शाळेतील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.
जुने आणि फाटके गणवेश घालून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे.
गरजू विद्यार्थ्यांना अजूनही नवे गणवेश मिळाले नाहीत. शिवाय मागच्या काही दिवसांमध्ये पोषण आहारातही बेडूक, अळ्या सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. एकीकडे राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याची घोषणा केल्यानंतर पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
तर दुसरीकडे मात्र शाळा सुरू होऊन २ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शाळांतील हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. १५ ऑगस्टला गणवेश मिळण्याची पालक आणि विद्यार्थ्यांना आशा होती मात्र ती देखील फोल ठरल्यामुळे जुने आणि फाटके गणेश घालून शाळेत जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. अखेर गणवेश मिळणार तरी कधी? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे.