लातूर : प्रतिनिधी
येथील साई रोडवरील आदिनाथ मंगल कार्यालय युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट अकॅडमीचे अध्यक्ष तुषार रमेशप्रसाद अवस्थी आणि जी.के. शतोक्वॉन कराटे अकॅडमीचे अध्यक्ष गणेश बळीराम काकड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग लातूर तथा राज्यचिटणीस महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी खेळाडूंना खेळातील शिस्त, चिकाटी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्याचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षस्थानी युवा उद्योजक आदिनाथ चव्हाण होते. तर क्रीडा अधिकारी बाबाजी इंगोले मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी गोडसे, इंजिनियर रितेश रमेशकुमार अवस्थी व सचिन बळीराम काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून एकूण ७४६ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांची दाद मिळवली. समारोपप्रसंगी सांघिक बक्षीस वितरण क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना पदके, प्रमाणपत्रे व चषक देऊन गौरविण्यात आले.
















