23.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeलातूरलातूर जिल्ह्या इयत्ता बारावी परीक्षेला प्रारंभ !

लातूर जिल्ह्या इयत्ता बारावी परीक्षेला प्रारंभ !

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील १०० केंद्रांवर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेसाठी ३७ हजार ६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा प्रथमच सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आली आहेत. तसेच या पथकांचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कंट्रोल रूम स्थापन  करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या कंट्रोल रुममधून जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर नियुक्त बैठे पथकातील अधिकारी, कर्मचा-यांशी संवाद साधला. तसेच जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
इयत्ता बारावी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावरून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख तसेच इतर वर्ग एक व वर्ग दोन अधिका-यांची ८९ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच सर्व १०० परीक्षा केंद्रावर प्रत्येकी महसूल विभागाचा एक कर्मचारी ग्रामविकास विभागाचा एक कर्मचारी व इतर विभागाचा एक कर्मचारी असे जिल्ह्यात एकूण ३०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर व्हिडिओ सर्व्हीलंस टीम (व्हीएसटी) स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बैठे पथकाद्वारे परीक्षा केंद्र परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूमची स्थापना करून झूम लिंकद्वारे प्रत्यक्ष तपासणी व पाहणी पाच व्यक्तीच्या टीमद्वारे करण्यात येत आहे.
कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात इयत्ता बारावीची परीक्षा पार पडावी, यासाठी सर्व १०० परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १०० पोलीस अधिका-यांसह १२०० पोलीस अंमलदार, होमगार्ड यांचा समावेश आहे. यासोबतच काही परीक्षा केंद्रांच्या परिसरात पोलिसांमार्फत ड्रोनद्वारे परीक्षा केंद्राची पाहणी करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR