19.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरलातूर येथील लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या ४०० विद्यार्थिनींना विषबाधा

लातूर येथील लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या ४०० विद्यार्थिनींना विषबाधा

शासकीय रुग्णालयात उपचार

लातूर : प्रतिनिधी
येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींच्या मातोश्री वसतिगृहात शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ३५० ते ४०० मुलींना जेवणातून विषबाधा झाली. मुलींना मळमळ सुरू झाल्याने तात्काळ १०८ च्या १२ रुग्णवाहिकांना पाचारण करून मुलींना विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात हलविले. यापैकी ६ मुली गंभीर असून, इतर मुलींना तात्काळ तपासून सोडून देण्यात आले तर ज्यांना त्रास होत आहे, त्यांच्यावर जागा मिळेल तिथे अ‍ॅडमिट करून घेऊन उपचार करण्यात येत आहेत. सर्व मुलींवर उपचार सुरू असून, सर्वांचीच स्थिती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी सांगितले.
पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी समोरच असलेल्या मातोश्री वसतिगृहात राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांना भेंडी, चपाती, वरण, भात जेवणासाठी दिले. त्यानंतर एक तासाने अनेक विद्यार्थिनींना मळमळ सुरू झाली. त्यावेळी वसतिगृहातील वैद्यकीय पथकांना बोलावून घेऊन तपासणी केल्यानंतर १०८ च्या रुग्णवाहिकांना पाचारण करून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी वसतिगृह ते शिवाजीचौक दरम्यान एका बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती. तसेच पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. जवळपास ३५० ते ४०० विद्यार्थिनींना शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आणि ज्यांना त्रास नाही, अशा विद्यार्थिनींना तात्काळ सोडूनही देण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच खा. डॉ. शिवाजी काळगे, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, युवक कॉंग्रेसचे इम्रान सय्यद, प्रवीण सूर्यवंशी, पुनित पाटील, अभिजित इगे, विष्णुदास धायगुडे, अकबर माडजे, रमेश सूर्यवंशी, गणेश देशमुख यांच्यासह इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रुग्णालयात येऊन विचारपूस केली. खा. डॉ. काळगे यांनी अधिष्ठाता डॉ. मोहिते यांच्याशी संवाद साधून रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली.
दरम्यान, जागा मिळेल, तिथे मुलींना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामध्ये ६ मुली गंभीर आहेत. दरम्यान, विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे समजू शकले नाही. मात्र, अर्धवट शिजलेली पाल असल्याचे सांगण्यात आले. त्यात काहींच्या मते सरडा तर काही जणांनी झुरळ निघाल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व विद्यार्थिनी गोंधळलेल्या होत्या.

६ मुली गंभीर, स्थिती धोक्याबाहेर
पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर डॉक्टर उपचार करीत आहेत. यात ६ मुली गंभीर आहेत. मात्र, सर्वच विद्यार्थिनींची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, विचारपूस सुरू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR