मुंबई : प्रतिनिधी
लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शेत नांगरणीसाठी बैल किंवा इतर कोणतीच उपकरणे नसल्याने या वृद्ध शेतक-याने स्वत:लाच औताला जुंपले आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला.
दरम्यान, एकीकडे सरकार शेतक-यांसाठी विविध योजना राबवत असताना अजूनही राज्यातील असंख्य शेतकरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याचेच ताजे उदाहरण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून समोर आले आहे. शेत नांगरणीसाठी बैल नसल्याने एका वृद्ध शेतक-याने स्वत:लाच औताला जुंपले. त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संबंधित शेतक-याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून नांगरणीसाठी त्यांच्याकडे बैलसुद्धा नाही. अशा परिस्थितीतही हार न मानता या वृद्ध शेतक-याने स्वत:ला औताला जुंपले. शेतकरी दाम्पत्याचे हे कष्ट पाहून अखेर अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंची मदत करण्यासाठी ओळखल्या जाणा-या सोनू सूदने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
सोनू सूदने , ‘तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो’, असे ट्विट केले आहे. तर लातूर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी संबंधित शेतक-याविषयीची माहिती दिली आहे. त्यांचे नाव अंबादास पवार असून त्यांची ४ बिघा जमीन आहे. ही जमीन सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहे. आमच्या अधिका-यांच्या पथकाने भेट दिली आणि त्यांना तिथे शेतीसाठी आवश्यक उपकरणांची कमतरता आढळली. म्हणून आम्ही त्यांना कृषी विभागात अनुदानित दरात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सांगितले, असे ते म्हणाले.
कृृषी विभागाकडून मदत
संबंधित शेतक-याकडे कृषी ओळखपत्र नव्हते. त्यामुळे कृषी अधिका-यांनी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचप्रमाणे लवकरच त्यांना कृषी विभागाकडून ट्रॅक्टर आणि १.२५ लाख रुपये यांसह सर्व उपकरणे मिळतील, अशीही माहिती बावगे यांनी दिली. वृद्ध शेतकरी दाम्पत्याचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यांच्याकडे शेत नांगरणीसाठीही पुरेसे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत वृद्ध दाम्पत्याने स्वत:च नांगर ओढण्यास सुरुवात केली. याचा व्हीडीओ कोणीतरी शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.