नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे ६ जून रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपत आहे. यामुळे भाजपमध्ये संघटनात्मकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राज्यातील नेते विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.
दरम्यान, विनोद तावडे यांच्याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान या नेत्यांच्या नावावरही विचार करण्यात येऊ शकतो, असे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत नाही मिळाले तर पक्षाच्या अपयशाचे खापर जे. पी. नड्डा यांच्यावर फोडून त्यांना डिच्चू देण्यात येईल आणि बहुमत मिळाले तर त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.