नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. केंद्र सरकार याबाबत नवीन विधेयक आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यात सुमारे ४० सुधारणांना मंजुरी दिली आहे, वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक या आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे.
मोदी सरकार वक्फ कायद्यातील दुरुस्ती विधेयक ५ ऑगस्ट रोजी संसदेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होतील.
मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रमुख दुरुस्त्यांमध्ये वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.
केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांच्या संरचनेत बदल करण्यासाठी वक्फ कायद्याच्या कलम ९ आणि कलम १४ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधेयकात असल्याचे सांगण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या विधेयकात राज्य वक्फ बोर्डांनी दावा केलेल्या वादग्रस्त जमिनीची नव्याने पडताळणी करण्याची मागणीही प्रस्तावित आहे. या विधेयकांतर्गत वक्फ बोर्डाने दावा केलेल्या मालमत्तेची सक्तीने पडताळणी केली जाईल.