वेल्लोर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील कट्टुकोल्लई गावाच्या लोकांना एक नोटीस मिळाली. यामध्ये त्यांची जमीन वक्फ संपत्ती असल्याचे म्हटले आहे. जवळपास १५० कुटुंबे आहेत, त्यांच्या चार पिढ्या ही जमिन कसत आहेत. परंतू, आता सुल्तान शाह यांनी ही नोटीस पाठविली आहे. ही जागा स्थानिक दर्ग्याची आहे, एकतर ही जमीन रिकामी करा किंवा दर्ग्याला कर द्या, असा फतवाच या नोटीसमध्ये काढण्यात आला आहे.
या घटनेमुळे गावकरी हादरले आहेत. चार पिढ्यांपासून ते इथे राहत आहेत, जमीन कसत आहेत. गावक-यांकडे या जमिनींचे सरकारी कागदपत्र आहेत. तर वक्फ बोर्डच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे जमिनीचे जुने कागद आहेत. यामुळे आता जुनाच वक्फ कायदा लागू राहिला तर काय होणार आणि नवीन कायदा लागू झाला तर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्याला या जमिनीतून बेदखल केले जाईल असे या गावक-यांना वाटत आहे. या गावक-यांनी कलेक्टर ऑफिस गाठले असून यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अशीच एक घटना यापूर्वीही तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील तिरुचेंदुरईमध्ये झाली होती. तामिळनाडू वक्फ बोर्डाने त्या गावातील जवळपास ४८० एकर जमीन आपली असल्याचे म्हटले होते. धक्कादायक बाब म्हणजे यात १५०० वर्ष जुने चोल वंशकाळातील एक मंदिर देखील होते. तेव्हापासून या गावातील लोक वक्फ बोर्डाच्या संमतीशिवाय त्यांची जमीन खरेदी-विक्री करू शकत नाहीत.