मुंबई : लोकसभेला विजयी झाल्याने काँग्रेसच्या आमदारांना विधानसभेचा राजीनामा द्यावा लागत आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. आज वर्षा गायकवाड यांनी राजीनामा दिला. आणखी एका महिला आमदाराचा राजीनामा येणे बाकी आहे. ऐन विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर आमदारांचे राजीनामे द्यावे लागल्याने काँग्रेसच्या संख्याबळात घट झाली आहे.
शिवसेनेचे दोन आमदार खासदार झाले आहेत. त्यांचेही राजीनामे येणे बाकी आहे. सर्वांधिक काँग्रेसचे आमदार लोकसभा सदस्यपदी निवडून गेले आहेत. यामुळे त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी शरद पवार गटातून उमेदवारी मिळताच राजीनामा दिला होता. परंतू, ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या रंिवद्र वायकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. तसेच संभाजीनगरहून खासदार झालेले संदिपान भुमरे देखील खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. वर्ध्याच्या काँग्रेसच्या नवनियुक्त खासदार प्रतिभा धानोरकरही आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.