नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी नागापूर परिसरातील गोदावरी नदीपात्रात धडक कारवाई करत ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील ४५ लाखांच्या ३ मोठ्या बोटी जागेवरच नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी ३ आरोपींसह इतर फरार व्यक्तींविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध रेती माफियांविरोधातील ही अलीकडील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नागापूर येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकण्यात आला. येथे नदीपात्रातून यांत्रिक साधनांच्या साहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करून तिची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान १० ब्रास वाळू, ३ मोठ्या लोखंडी बोटी, १ लहान बोट तसेच वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यातील काही साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आल्याची नोंदही पोलिसांनी केली आहे.
















