मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी विरोधकांनी ‘भ्रष्टाचाराचे लाभार्थी कोण? शिंदे-फडणवीस’ अशा घोषणा दिल्या. महायुती-भाजपा सरकारची लाडकी कंपनी मेघा इंजिनीअरिंगला राज्यात अनेक प्रकल्प निकृष्ट दर्जाचे काम करूनसुद्धा देण्यात आले आहेत. मेघा इंजिनीअरिंगने महाराष्ट्रात विविध विकासकामांत ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे.
अधिवेशनाच्या दुस-या दिवशी शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा विधान भवनात गाजला. काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी अध्यक्षांसमोरील राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला, या कारणास्तव नाना पटोले यांचे एक दिवसासाठी निलंबन करण्यात आले. अधिवेशनाच्या तिस-या दिवशी नाना पटोलेंच्या निलंबनाचे पडसाद विधान भवनात पाहायला मिळाले. नाना पटोले यांचे निलंबन आणि मेघा इंजिनीअरिंगमधील तीन हजारांहून अधिकच्या टेंडर घोटाळ्याविरोधात विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पाय-यांवर घोषणाबाजी केली.
यासंदर्भात बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. नंतर या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला. या सरकारला हे टेंडर मागे घ्यावे लागले. या टेंडरमध्ये ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.
मेघा इंजिनीअरिंग ही कंपनी भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठे इलेक्ट्रॉल बाँड देणारी कंपनी आहे. जाणीवपूर्वक या कंपनीला टेंडर दिले हे स्पष्ट होते आणि म्हणून या टेंडरमध्ये ३,००० कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. असे अनेक भ्रष्टाचार या सरकारच्या काळात महाराष्ट्रात झाले आहेत. त्याविरुद्ध आज आम्ही विरोधी पक्ष पूर्णपणे महाविकास आघाडी पाय-यावर उतरून आंदोलन केलेय. उद्या गरज पडल्यास रस्त्यावरसुद्धा उतरून आम्ही आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.