निलंगा / औसा : प्रतिनिधी
विकासापासून वंचित राहिलेल्या कासारसिरसी मंडळातील गावांना विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून या भागाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असून अनेकांची इच्छा कासारशिरसी तालुका व्हावा, अशी होती आणि कासारशिरसी तालुका होणारच असून राज्यात नवीन तालुका निर्मितीवेळी कासारसिरसीबरोबर किल्लारीसह दोन तालुक्याची निर्मिती होणार आहे. हे दोन्ही तालुके होत असताना त्या भागातील संबंधित गावांना ग्रामसभेच्या माध्यमातून तालुका निवडीची मुभा असून कोणावरही कोणताही निर्णय लादला जाणार नाही. विकासापासून कोसोदूर राहिलेल्या ६८ गावांना विकासाचा पहिला घास दिला असल्याची ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. ६८ गावातील प्रचाराचा शुभारंभ (दि.२७) ऑक्टोबर रोजी देवी हल्लाळी येथे श्रीफळ फोडून करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, बसवराज कलशेट्टी, सुनील माने, सरपंच लक्ष्मण गिरी, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, बालाजी पाटील, हभप दत्तात्रय बरमदे, औसा शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, नितीन पाटील, ओम बिराजदार, शिवशरण पाटील,मयुर गब्बुरे, विरेशचिंचनसुरे, मल्लिकार्जुन दानाई, वामन मुळे, सिध्दार्थ बिराजदार, कैलाश पाटील, राहुल सुर्यवंशी, श्रीमंत मोरे,जिलानी बागवान, महिला मंडळ अध्यक्षा कविता गोरे, कल्पना ढविले, कल्पना गायकवाड, ज्योती कलशेट्टी, आदीसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ अभिमन्यू पवार म्हणाले की, कासारसिरसी तालुका होण्याअगोदर याठिकाणी शासकीय कार्यालये उभारले जात असून आपण जे बोललो ते करून दाखवले आहे. विरोधकाकडे माझ्याबद्दल बोलायला मुद्दाच नाही. त्यामुळे माझ्याबद्दल चुकीचा प्रचार करीत आहेत. मला सर्व बाजूनी घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र मी पाच वर्ष जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम तत्पर राहिलो आहे. त्यामुळे जनता माझ्यासोबत आहे.
विरोधकांनी बोलायचे असेल तर विकासावर बोलावे पाच वर्षांत राज्यातील इतर आमदारांच्या तुलनेत औशाला अधिकचा निधी उपलब्ध झाला असून ही पोटदुखी काही लोकांना होत आहे. विकासानिधी देत असताना त्या गावाचा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे. हे मी कधीही पाहिले नसून त्या गावाची जनता बघून निधी दिला आहे. शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत मतदारसंघातील शेतक-यांंची आर्थिक क्रांती झाली असून शेतक-यांना शेतीपूरक व्यवसाय मिळाली आहे. शेतरस्ता हा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील लोक शेतरस्त्यांचा अभ्यास करण्यासाठी मतदारसंघात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनीही मनोगत व्यक्त करीत या भागातील मतदारांनी खंबीरपणे आ अभिमन्यू पवार यांची साथ देत विकासाला गती देण्यासाठी आ अभिमन्यू पवार यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.