अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून दोन मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
अपघात घडल्यानंतर गंभीर अवस्थेत दोघांना स्वामी रामानंद तीर्थ (स्वा.रा.ती.) रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ऐन सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या काळजाचा ठोका चुकवणा-या घटनेमुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह परिसरात अत्यंत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यशवंत ऊर्फ खंडू कोंडीराम वाघमारे (वय ३३) आणि बबन चंद्रकांत वाघमारे (वय ५०, दोघेही रा. मंगळवार पेठ, चांभार गल्ली, अंबाजोगाई) अशी मृत्यू झालेल्या दुर्दैवी कामगारांची नावे आहेत.
दररोजप्रमाणे कामावर जातो असे घरात सांगून अत्यंत आनंदाने सकाळी डबा घेऊन निघालेल्या या कष्टकरी मजुरांवर दुपारी अचानक काळाने झडप घातली. मृत यशवंत वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सुमारे दीड वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले असल्याने कुटुंबाचा संपूर्ण भार यशवंत यांच्यावरच होता.
तर दुसरीकडे मृत बबन वाघमारे हे अत्यंत निष्णात ड्रायव्हर होते. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाल्याने ते सुटीच्या दिवशी सेंटरिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार असून त्यांच्याही अचानक जाण्याने कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेला आहे. मंगळवार पेठेतील दोन कष्टकरी तरुणांचा एकाच वेळी असा अंत झाल्याने चांभार गल्ली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
















