लातूर : प्रतिनिधी
शहरातील वाहतुकीसंदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा विषयक बैठकीचे आयोजन आज दि. २६ मे रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणा-या या बैठकीत शहरातील वाहतुकीसंदर्भात विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यातून सद्या वाहतुकीसंदर्भातील विविध अडचणी सोडविण्याच्या दृ्ष्टीने महत्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
लातूर शहरात मागील काही वर्षांपासून वाहतुकीसंदर्भात विविध समस्या भेडसावत आहेत. यामध्ये विविध मार्गावर होणारी वाहतुक कोंडी ही लातूरकरांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहतुक कोंडीला अनेक बाबी या जबाबदार आहेत. यामध्ये बेशिस्त आणि नियमबा वाहतुक, वाहनांच्या थांब्याचा प्रश्न अवजड वाहने आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीचा फास हा शहराभोवताली अवळत चालला आहे.
दरम्यान आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा विषयक बैठक होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लातूर शहरातील काळी-पिवळी, सहा आसनी मिनी डोअर यांच्या थांब्यात बदल करुन ते शहराबाहेर हलविणे, शहरातील खाजगी ट्रॅव्हलसला शहरात प्रवेश बंद करुन शहराबाहेर थांब्याची जागा निश्चित करणे, लातूर शहरातील रहदारीच्या व मुख्य चौकातील ७५ मीटरपर्यंत नो स्टॉपिंग झोन संदर्भात चर्चा आणि अधिसूचना काढणे यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये सद्या एस. टी. प्रवासी संघटनेने लावून धरलेल्या विषयावर चर्चा होणार आहे.