लातूर : प्रतिनिधी
जगाला अहिंसेचा संदेश देणार्या भगवान महावीरांच्या चरित्राचा शालेय अभ्यासक्रमात विस्तृत समावेश झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व नामांकित वक्त्ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले. लातूर येथील सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांचा २६२३ वा जन्मकल्याणक महोत्सव आज प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. कोकाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी लातूर जैन मंडलाचे अध्यक्ष सीए तेजमलजी बोरा होते. विचारमंचावर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. महावीर उदगीरकर, सुमतीलालजी छाजेड, नॅबचे विजय राठी यांची उपस्थिती होती. सुरुवातीस शहरातील लाड गल्ली भागातील दिगंबर जैन मंदिरापासून सकाळी ६.३० वा. प्रतिमा पालखीसह प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी वर्धमान उद्यान येथे विसर्जित झाल्यानंतर तेथेच भव्य सभामंडपात आयोजित व्याख्यानात डॉ. कोकाटे यांनी जैन व बौद्ध तत्वज्ञानाची सोदाहरण उकल केली. तत्पूर्वी स्वागताध्यक्ष प्रा. उदगीरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भगवान महावीरांनी जगात सर्वप्रथम स्री स्वातंत्र्याचा पाया त्यांनी घातला, असे सांगून डॉ. कोकाटे म्हणाले, जैन धर्म नैतिक अधिष्ठानावर आधारित असून तो मानवतावादी तत्वज्ञानाचे समर्थन करतो. महावीरांनी सांगितलेल्या कायिक, वाचिक आणि मानसिक अहिंसा धर्माचे पालन केल्यास जगातील युद्धजन्य परिस्थिती आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वासही डॉ. कोकाटे यांनी व्यक्त केला. जैन धर्मातील सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चारिर्त्य ही मूल्ये आपण अंगिकारली पाहिजेत, असे ते शेवटी म्हणाले.
महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सीए व कॅनरा बॅकेचे माजी संचालक सुनील कोचेटा, वास्तुविशारद वर्धमान आहेरकर यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजेश डुंगरवाल व डॉ. कंडारकर यांनी ध्वजगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश डुंगरवाल यांनी, तर आभारप्रदर्शन सीए सुनील कोचेटा यांनी केले. गुजराती हायस्कूलच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी महावीरांच्या जीवनप्रसंगावर आधारित एक नाटिका यावेळी सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.