31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूरतात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी

तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी

लातूर : प्रतिनिधी
लातुर शहर व जिल्ह्यासह राज्यतील अनेक ठिकाणी शनिवार दि. २१ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीचा फटका फळ बागांसह शेतीला बसला असून यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. यातच शनिवारी सकाळ पासूनच लातुर शहर व ग्रामीण भागासह जिल्हाभरात ढग दाटून आले, आणि लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले व लातूर शहरसह ग्रामिण मधील खोपेगाव, गंगापूर, चिखलठाणा, रामेश्वर, खंडापूर, सेलू बू. तसेच निलंगा तालुक्यातील कासार शिरसी, हासोरी, दगडवाडी, औसा तालुक्यातील किल्लारीसह परिसरात ज्वारीसह द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असून या भागामध्ये गारांचा पाऊस देखील झाला आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघातील लातूर, रेणापूर सोबतच औसा तालुका व लातूर जिल्ह्यातच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी या पिकांबरोबरच आंबा, द्राक्ष फळबागा व पालेभाज्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. याशिवाय काह ठिकाणी पशुधन दगावल्याच्या घटनाही घडल्या असून काही दिवसापूर्वी लातुर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी २०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता त्याबद्दल माहिती घेण्याचं काम प्रशासनाकडून सुरु  असताना त्यातच शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बळीराजाचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान क्षेत्रात आता वाढ होताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR