परभणी : शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात दुष्काळ पाहणी करण्यासाठी येणार आहेत. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे सकाळी १० वाजता ते नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. टाकळी येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर ते परतूर तालुक्यातील वरफळ येथे जाणार आहेत.
परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे. खरीप हंगामातील पिके नष्ट झाली आहेत. जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौ-यावर येत आहेत. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण शिवारात रविवारी सकाळी १० वाजता आदित्य ठाकरे हे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. या दौ-यात शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क नेते आ. अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परभणी लोकसभा संपर्क प्रमुख प्रदीपकुमार खोपडे, आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.
















