मुरुड : वार्ताहर
मुरुड शहरात १५ जुलै २०२६ रोजी कंधार येथील श्री संत साधू महाराज कंधारकर संस्थानची आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणारी पारंपरिक पायी दिंडी याहीवर्षी टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या नामगजरात रवाना झाली.
संस्थानचे आठवे वंशज, मठाधिपती ह.भ.प. एकनाथ महाराज साधू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिंडी चालक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कंधारकर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी सकाळी १२ वाजता ही पायी दिंडी संस्थानातून रवाना झाली. मराठवाड्यातील मानाच्या व ऐतिहासिक दिंडींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणा-या य दिंडीचे यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थानाने नव्याने तयार केलेला चांदीचा पालखी रथ होय. प्रस्थानापूर्वी श्री संत साधू महाराज संस्थान येथे सर्व वंशज, मठाधिपती आणि देवदेवतांची आरती करून दिंडी मार्गस्थ झाली. ही दिंडी कंधार, लोहा, माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरूर, चापोली, चाकूर, घरणी, भातखेडा, लातूर, साकरा, बोरगाव, मुरूड, ढोराळा, ढोकी, तडवळे, येडशी, घारी, जामगाव, बार्शी, म्हैसगाव, कुडूवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
आषाढ शुद्ध अष्टमी, २२ जुलै रोजी दिंडी पंढरपूरात दाखल होणार आहे. दिंडीचे नियोजन ह.भ.प. ज्ञानेश्वर साधू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, दररोज सुमारे १५ ते २० किलो मीटरचा प्रवास केला जातो. भाविकांकडून वारक-यांसाठी चहा, नाश्ता, भोजन व निवासाची व्यवस्था केली जाते. दररोज रात्री हरिकीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि दुस-या दिवशी पहाटे नामस्मरण करीत दिंडी पुढील प्रवासाला निघते.
दिंडीत सहभागी होऊ इच्छिणा-या वारक-यांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी संपर्क प्रमुख दत्ता माने (९८२३१७७०९६), श्रीराम करेवाड (८३२९२६९४३२), एकनाथ गोटमवाड (८४२१२००२३०), संदीप महाराज आलेगांवकर (९६६५७११५१३), अरुण येईलवाड (९१४६१३०६१९), श्रीराम येईलवाड (९४२३६५६८१७) व गंगाधर कावडे (९५६१८१६७९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री संत साधू महाराज कंधारकर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
















