25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत शाही स्नान

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत शाही स्नान

पालखी सोहळा सोलापूरच्या दिशेने रवाना

बारामती : प्रतिनिधी
‘माऊली-माऊली’नामाचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मंगळवारी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नीरा नदीच्या काठावर मोठी गर्दी केली होती.

आषाढी एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या वाटेवर आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोमवारचा मुक्काम सराटी येथे झाला. आता संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. त्याआधी नीरा नदीच्या पात्रात तुकोबांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले.

यंदा ऐतिहासिक योग
देहू संस्थानच्या प्रतिनिधींसह स्थानिक ग्रामस्थ, वारीप्रमुख आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्याने सराटी परिसर भक्तिरसात न्हावून निघाला होता. यावर्षी विशेष म्हणजे पावसामुळे नीरा नदीत पाणी वाहत असल्याने अनेक वर्षांनंतर पादुकांना प्रत्यक्ष नदीपात्रात शाही स्नान घालण्याचा ऐतिहासिक योग आला. मागील काही वर्षांपासून टँकरच्या पाण्यावरच हा विधी पार पडत होता.

पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना
शाही स्नानानंतर ‘तुकाराम-तुकाराम’च्या गजरात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याचा मंगळवारचा मुक्काम अकलूज येथे आहे. हजारो भाविकांनी पवित्र नीरा नदीत स्नान करीत संतांच्या पादुकांच्या चरणस्पर्शाचा लाभ घेतला. भक्तिरसात न्हालेले वातावरण, श्रावणसरीसारखे अभंग आणि श्रद्धेचा झरा या सोहळ्यात अनुभवता आला. सराटी मुक्कामानंतर आता तुकोबारायांची पालखी सोलापूर जिल्ह्यात नवचैतन्य घेऊन प्रवेश करीत आहे. वारक-यांमध्ये उत्साह, भक्तिमय वातावरण आणि पावसाने दिलेली साथ यामुळे यंदाची वारी संस्मरणीय ठरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR