बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणानंतर तब्बल ८४ दिवसांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. मात्र या प्रकरणाचा लढा संपला नसून मोठ्या संख्येने संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक पुढे आले आहेत. यातच आता काँग्रेसने मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बीडमध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान, मस्साजोग ते बीड या ५१ किलोमीटरच्या पदयात्रेत राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी सामील झाले आहेत. यात्रेच्या माध्यमातून सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यादरम्यान एक मुक्काम नेकनूर येथे करून यात्रा बीडमध्ये दाखल होणार आहे. सद्भावना सभेच्या माध्यमातून रॅलीचा बीडमध्ये समारोप होईल. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.
आरोपींच्या चेह-यावर हास्य कसे?
संतोष देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, देशमुखांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेला आहे आणि याबाबत समाजाने चिंतन करण्याची गरज आहे. मारेक-यांच्या चेह-यावर हास्य येते तरी कुठून? ही लढाई देशमुख कुटुंबियांची नाही तर ही लढाई सर्वांना लढावी लागणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील यावेळी सपकाळ यांनी केली.