वीज पडून एका दाम्पत्यासह ५ ठार, ४ गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यामउळे शेतक-यांची खरिपाची पिके वाळून गेली. सध्या दुष्काळसृदश परिस्थिती असल्याने शेतक-यांनी सरकारच्या निधीकडे, घोषणेकडे आस लावली आहे. त्यातच आज दुपारी छ. संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून घडलेल्या २ घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. यात सिल्लोड येथील दहिगावात वीज पडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
जालन्यासह मराठवाड्यातील काही भागांत वादळी वा-यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. त्यातच संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे वादळी पावसादरम्यान शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पती-पत्नीवर काळाचा घाला झाला. झोपडीवर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मनोहर भिवसन दुधे (५५), त्यांच्या पत्नी पर्वताबाई मनोहर दुधे (५०) अशी मृतांची नावे आहेत तर त्यांचा मुलगा पंढरी मनोहर दुधे (३०, सर्व रा. दहीगाव, ता. सिल्लोड) गंभीर जखमी झाले आहेत. ते आपल्या शेतात मुगाच्या शेंगा तोडत होते. त्यावेळी पाऊस आल्याने त्यांनी शेतातील झोपडीचा आश्रय घेतला होता.
दरम्यान, कन्नड तालुक्यातील पिशोर येथेही वीज कोसळून ३ महिलांचा मृत्यू झाला असून, २ महिला आणि १ पुरुष गंभीर जखमी झाले. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्ह्यातील या दोन घटनांमुळे हळहळ व्यक्त होत असून, वादळी पावसादरम्यान नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जालना जिल्ह्यात
दमदार पाऊस
जालना शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला असून अनेक दिवसांच्या खंडानंतर जालन्यात दमदार पावसाचे आगमन झाल्याने दिलासा मिळाला. आज सकाळपासूनच शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. जवळपास १ तास शहर परिसरात पाऊस झाला. जालना तालुक्यासह अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला.
















