राजकीय हालचालींना वेग, शाह यांच्या निवासस्थानी २ तास चालली बैठक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे उघड झाल्यानंतर आज महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जवळपास पावणेदोन तास बैठक चालली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, या बैठकीत संपूर्ण फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. मात्र, याबाबत मीडियाशी संवाद साधलेला नाही. त्यामुळे दोन दिवसांत भाजपचे निरीक्षक मुंबईत दाखल होतील आणि तेथे बैठक घेऊन मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय जाहीर करतील आणि २ डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांचा सत्कार करताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या चेह-यांवर हसू होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर होता. त्यामुळे महायुतीत भाजप, राष्ट्रवादीला अनुकूल असलेला निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कुणीही वाच्यता केलेली नसली तरी बैठकीतील चेहरेच नेमके काय घडले आहे, हे सांगून जात होते. रात्री सव्वाबारापर्यंत ही बैठक पार पडली. त्यानंतर रात्री १ च्या विमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार मुंबईला परतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या बैठकीत कोणाच्या वाट्याला कोणते मंत्रिपद आणि तिन्ही पक्षाला किती मंत्रिपदे यावरही चर्चा झाली असून, तिन्ही पक्षांनी नव्या तरुण चेह-याला संधी देण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार गृह मंत्रालय भाजपकडे म्हणजेच फडणवीस यांच्याकडे आणि अर्थ मंत्रालय अजित पवार यांच्याकडे राहू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मंत्रिमंडळात एकूण ४३ सदस्य संख्या असणार आहे. त्यामुळे यात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक २० ते २२ मंत्रिपदे येणार असून, शिवसेनेच्या १२ जणांना संधी मिळू शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला ९ ते १० मंत्रिपदे येऊ शकतात. भाजपसह तिन्ही पक्षांनी नव्या मंत्रिमंडळात तरुण आमदारांना संधी द्यावी, असा सल्ला भाजप श्रेष्ठींकडून देण्यात आला. येत्या २ डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी पार पडेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
फडणवीस-पवारांमध्ये
चालली दीड तास चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत येण्याअगोदर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते. अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक होण्याअगोदर अजित पवार आणि फडणवीस यांच्यात जवळपास दीडतास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सत्तास्थापनेबाबत स्वतंत्र चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांना सोबत न घेता चर्चा झाल्याने या बैठकीबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
शिंदेंच्या चेह-यावर निराशा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी हजेरी लावली आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत राज्यात सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरला. परंतु या बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला होता. त्यांचे संयुक्त फोटो बाहेर आले, त्यात ते जाणवत होते. त्यामुळे शिंदे यांच्या मनाप्रमाणे फार काही घडले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बैठकीत नेमके काय ठरले, हे अजून स्पष्ट झाले नसले तरी याबाबत शिंदे अस्वस्थ असल्याचे चित्र पाहायला मिळाले.