नागपूर : प्रतिनिधी
राजधानी मुंबई आणि पुणे शहरात यंदा पावसाचा जोर दिसून आला. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विशेषत: मराठवाड्यात एल निनोचा परिणाम दिसत आहे. या भागाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच हवामान विभागाचा अंदाज बळीराजाला आणखी चिंतेत टाकणारा आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यातही एल-निनोचा प्रभाव आणखी तीव्रतेने जाणवणार असून विदर्भ, मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांची पावसाची तूट ऑगस्ट महिनाअखेर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. एल निनोमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आणि शेती संकट वाढण्याची चिन्हे आहेत.
मराठवाड्यात आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता असली तरी त्यानंतर पावसाची मोठी उघडीप राहण्याचा अंदाज आहे. २७ ऑगस्टपर्यंत पाऊस नसण्याची शक्यता लक्षात घेता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने शेतक-यांना विशेष कृषी सल्ला दिला. पिकांना पाण्याचा ताण येऊ नये, यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासोबतच आवश्यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच सोयाबीनवर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी केले.
विदर्भाची सध्याची पावसाची तूट २२ ते २५ टक्के दरम्यान असली तरी ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत ती ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात आधीच सक्रिय असलेला एल निनो आणखी सशक्त होईल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही दमदार पावसाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे संकेत हवामान शास्त्रज्ञांनी दिले. त्यामुळे येणारे दिवस वैदर्भियांसह शेतक-यांसाठी चिंता वाढविणारे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. ब-याचदा ढग दाटून येतात. परंतु पाऊस पडत नाही. कारण मान्सूनची द्रोनिका सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सक्रीय आहे. तसेच दमदार पाऊस पडेल, असा कुठलेही कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत नसल्याने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य भारतातील अनेक भागांत पावसाची तूट निर्माण झाली आहे, अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली.
ऑगस्टअखेरही
मोठा पाऊस नाही?
मराठवाडा, विदर्भात बहुतांश शेती क्षेत्रात पेरणी झाली असून, पिके चांगली आली आहेत. सध्या पावसाची अत्यंत गरज आहे. परंतु ऑगस्ट महिन्याच्या उरलेल्या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडणार नाही. फक्त अधून मधून रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे.
















