नागपूर : प्रतिनिधी
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिस-या आघाडीच्या माध्यमातून येणा-या निवडणुकीत वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. त्यातच बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवार यादीबाबत भाष्य करत आज किंवा उद्या उमेदवारांची यादी येणार असल्याचे सूतोवाच केले आहे. तसेच समोर कुणीही नेता अथवा दिग्गज उमेदवार असला तरी आम्ही उमेदवार देणारच, असा निर्धारही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार असून दुसरीकडे तिसरी आघाडी मैदान लढविण्यास सज्ज आहे.
माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी व स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आम्ही सगळे आज बसून बैठक घेणार आहोत. ज्या आमच्या मजबूत जागा आहेत ती यादी आम्ही आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काय बिघाडी होते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जवळपास १०० लोकांची सगळी यादी असेल. मग कोणतेही मोठे नेते असले तरी त्याविरोधात आम्ही उमेदवार देणार, आम्हाला कसली भीती.. आणि बच्चू कडू कधीही भीत नाही, असे म्हणत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिस-या आघाडीच्या यादीबद्दल भाष्य केले आहे.
जिल्ह्यात भाजप ठेवायचीच नाही
भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागली आहे, अशी सध्या स्थिती आहे. भाजपच्या खांद्यावर पंजा फडकवण्याची स्थिती एकंदरीत माझ्या मतदारसंघात भाजपची आहे. जिल्ह्यात भाजप ठेवायचीच नाही, अशी राणा कुटुंबाने व्यवस्था निर्माण केली आहे. प्रवीण तायडे हा नवा कार्यकर्ता आहे. अनेक स्वत:वर गुन्हे दाखल केलेले जुने कार्यकर्ते आहेत. केंद्रात सत्ता असताना नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपची हार आहे. जे राम मंदिर चळवळीमध्ये सहभागी झाले त्यामध्ये अनेकांचे परिवार बरबाद झाले. अशांना भाजप निवडून आणू शकत नाही, हे मोठे दुर्दैव आहे.