28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसंपादकीयसरसंघचालकांचा ‘इशारा’!

सरसंघचालकांचा ‘इशारा’!

मोदी यांना तिस-या वेळी भाजपला स्पष्ट वा साधे बहुमत मिळवून देता आले नाही. मात्र, मित्रपक्षांच्या मदतीने रालोआला बहुमत मिळाले व सलग तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अबाधित विक्रमाची बरोबरी करण्याची मोदींची इच्छा एकदाची पूर्ण झाली! त्याचा जल्लोष मोदी समर्थकांनी केला व तो साहजिकच! मात्र, मोदी यांच्यासह भाजपला या टप्प्यावर पोहोचविण्यासाठी मागच्या कित्येक दशकांपासून अत्यंत समर्पणाने अविरत परिश्रम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था मोदी-शहांच्या कारभारावर व कार्यपद्धतीवर खुश नव्हे तर चक्क नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वत: सरसंघचालक मोहन भागवत यांनीच मोदी-शहा जोडीच्या कार्यपद्धतीची चिरफाड करून या जोडीचे जोरदार बौद्धिक घेतले आहे. संघाच्या कार्यपद्धतीनुसार भागवतांनी असे जाहीर बौद्धिक घेणे म्हणजे मोदी-शहांसाठी इशाराच आहे. हा इशारा सध्या ‘शहाण्याला शब्दांचा मार’ या प्रकारातला आहे, हे मान्यच पण जर मोदी-शहा यांनी तो गांभीर्याने घेतला नाही तर संघ येत्या काळात त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी ‘कडक मात्रा’ देण्यास सुरुवात करेल यात कुठलीच शंका नाही. त्यामुळे मोदींना आपल्या तिस-या कार्यकाळात केवळ मित्रपक्षांच्या दबावालाच नव्हे तर रा. स्व. संघाच्या दबावालाही सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. यातून संघ व भाजपमध्ये संघर्ष सुरू होणार का? अशी शंका आता उपस्थित झाली आहे.

भागवतांनी मोदींच्या बौद्धिकासाठी विषय निवडला तो मणिपूरचा! आपल्या जाहीर भाषणात भागवतांनी ‘गेले वर्षभर मणिपूर शांततेच्या प्रतीक्षेत आहे,’असे अत्यंत स्पष्ट वक्तव्य केले. त्याचा संपूर्ण रोख पंतप्रधान म्हणून मोदींनी मागच्या वर्षभरापासून अशांत मणिपूरकडे केलेल्या साफ दुर्लक्षाकडेच होता. योगायोगाने भागवतांनी हे वक्तव्य केले त्याच दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या सुरक्षा ताफ्यावर तिकडे हल्ला झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मणिपूरमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. जनतेने राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. मोदी यांनी ज्या तत्परतेने व प्राधान्याने मणिपूरकडे पंतप्रधान म्हणून लक्ष द्यायला हवे होते ते त्यांनी दिले नाही म्हणूनच भागवतांनी ‘मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या प्रतीक्षेत आहे’, असे वक्तव्य केले आहे. मोदींनी आपली चूक आता तरी तत्परतेने सुधारावी, हा या वक्तव्यातील गर्भित इशारा आहे. तो मोदी कितपत गांभीर्याने घेतात, हे आता पहावे लागेल. व त्यावरूनच येत्या काळात संघ व भाजपमधील संबंध कसे राहतील, हे ठरणार आहे.

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी भाजपला संघाच्या मदतीची गरज नसल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. मोदी-शहांच्या पाठबळाशिवाय नड्डा असे वक्तव्य करण्याचे धाडस करूच शकत नाहीत, हे स्पष्टच! निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशात भाजपला बसलेला जोरदार फटका हा संघाच्या नाराजीचा परिणाम असल्याची चर्चा आता रंगली आहे. डॉ. भागवत यांनी आपल्या याच जाहीर भाषणात संत कबीर यांचा ‘कर्म करे कर्ता नही, दास कहाये सोय’, हा चरण सांगितला व मोदी-शहा यांना ‘ग’ची बाधा होत असल्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिला. निवडणूक प्रचारात ‘सब कुछ मोदी’ थाटाने भाजपने जो प्रचार केला त्यावरची भागवतांची ही स्पष्ट नाराजी होती. सरकार म्हणून जनतेने निवडून दिल्यावर जनतेची सेवा करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. हे कर्तव्य पार पाडताना मी केले, मी केले असे सांगणे चुकीचेच! हे सेवक असल्याचे लक्षण नाही, असेही भागवतांनी स्पष्टपणे बजावले. भागवतांनी याच भाषणात बाळासाहेब देवरसांनी जातीव्यवस्थेवर कठोर टीका केली होती याची आठवण करून देत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवरही टीका केली.

निवडणूक प्रचारादरम्यान भागवतांचा आरक्षणाला विरोध असल्याचा खोटा व्हीडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्याचा खरपूस समाचार भागवतांनी घेतला. निवडणूक प्रचारात मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत. प्रतिस्पर्धी नव्हे तर शत्रू समजून एकमेकांवर आरोप केले गेले, खोटा प्रचार झाला, संघाला विनाकारण प्रचारात ओढण्यात आले, अशा शब्दांत भागवतांनी खालावलेल्या प्रचार पातळीवरही स्पष्ट नाराजी व्यक्त केली. भागवतांनी आपल्या भाषणात मोदी सरकारचे कान टोचतानाच या सरकारच्या कामकाजाचे कौतुकही केले. मात्र, आर्थिक विकास व प्रगतीची सध्याची परिभाषा योग्य आहे का? हा अत्यंत कळीचा व महत्त्वाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एकूणच पर्यावरणावर विकासाच्या नावाने होत असलेले आघात व सामान्यांना त्याचे सोसावे लागणारे दुष्परिणाम याकडे भागवतांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. भागवतांच्या भाषणात अनेक विषय असले तरी त्यांच्या या भाषणातून मोदी-शहा यांच्या कार्यपद्धतीबाबतची नाराजी स्पष्ट झालेली आहे.

ती भाषणाच्या ओघात वा चुकून व्यक्त झालेली नाही तर त्यांनी मोदी-शहा यांना कार्यपद्धती सुधारण्याचा थेट इशाराच दिला आहे. याचा मोदी यांच्या तिस-या कार्यकाळाच्या कारभारावर कितपत परिणाम होतो, हे पहावे लागेल. मोदी-शहा स्वत: पूर्वाश्रमीचे संघ स्वयंसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना सरसंघचालकांनी दिलेल्या इशा-याचे गांभीर्य नक्कीच कळले असेल. त्यातून योग्य तो बोध घेत ते आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणार की, सरसंघचालकांचा हा इशारा उडवून लावणार यावर येत्या काळातील संघ व भाजपमधील संबंध कसे राहणार हे अवलंबून असणार आहे. जर मोदी-शहा यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही तर त्यांना झालेली ‘ग’ची बाधा कशी उतरवायची हे संघाला चांगलेच कळते. यापूर्वी संघाने अशा शस्त्रक्रिया अत्यंत शिताफीने पार पाडलेल्याच आहेत. ‘ब्रँड मोदी’समोर या कार्यकाळात संघाचेही आव्हान असणार आहे, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR