छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता साखरेनंतर गुळाच्या किमतीही वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुळाच्या एक किलोला ८० ते ८५ रुपये मोजावे लागत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी गुळाचे भाव ६० रुपये किलो होते. दहा किलोची भेली घ्यायची असेल तर ७० ते ७५ रुपये किलोने गूळ मिळतो आहे.
साखरेच्या दरवाढीनंतर आता गुळाच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ बाजारात गुळासाठी आता ग्राहकांना किलोमागे ८० ते ८५ रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी हाच गूळ ६० रुपये किलो दराने मिळत होता. म्हणजेच पंधरा दिवसांत गुळाच्या दरात तब्बल २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. दहा किलोची भेली घेतल्यास होलसेल बाजारात ग्राहकांना ७० ते ७५ रुपये किलो मोजावे लागत आहेत. अचानक गुळाच्या दरात एवढी वाढ का झाली? बाजारात गुळाचा पुरवठा कमी झाला आहे का? की उत्पादन आणि मागणीतील बदलाचा हा परिणाम आहे? ऐन सणासुदीच्या तोंडावरती दरवाढ झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.
साखरेच्या इतिहासात सर्वांत मोठी वाढ
सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेने मोठी उसळी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या साखरेच्या इतिहासात सर्वांत मोठी वाढ झाली आहे. साखर ७ हजार ५०० प्रति क्विंटलवर गेली आहे. तर वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
















