17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरसायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी !

सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी !

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि लातूर सायकलिस्ट्स क्लबच्यावतीने मतदार जागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून ‘सायकल चालवा आरोग्यासाठी, मतदान करा लोकशाहीसाठी’ असा संदेश देण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत रॅलीचा समारोप झाला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, स्वीपचे नोडल अधिकारी तथा माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, नायब तहसीलदार एस.एस. उगळे, लातूर सायकलिस्ट्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु झालेल्या रॅलीमध्ये लातूर सायकलिस्ट्स क्लबच्या सदस्यांसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथून पीव्हीआर चौक, संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेणापूर नाका आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, गुळ मार्केट, महात्मा बसवेश्वर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.
भारतीय लोकशाही व्यवस्थेत १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मतदार यादीत नाव असणा-या प्रत्येक व्यक्तीला आपला हक्क बजाविता येतो. आपली लोकशाही व्यवस्था सदृढ आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने येत्या ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल लातूर सायकलिस्ट्स क्लबच्या पदाधिका-यांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR