राहुल गांधी यांचा आरोप, उत्तरपत्रिका फोनद्वारे स्कॅन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीबीएसईच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्वयंचलित रोबोटिक स्कॅनरऐवजी मोबाईल फोनने स्कॅन करण्यात आल्या, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
विद्यार्थी सार्थक सिद्धांतची एक पोस्ट शेअर करत राहुल गांधी म्हणाले की, ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीमची निविदा ऑगस्टमध्ये पुन्हा जारी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक अटी काढून टाकण्यात आल्या आणि स्कॅनिंगची गुणवत्ता ३०० डीपीआयवरून २०० डीपीआयपर्यंत कमी करण्यात आली. अस्पष्ट उत्तरपत्रिका, गहाळ झालेली पाने आणि अनेक प्रती स्कॅन न होणे या केवळ तांत्रिक चुका नाहीत. त्यांच्या मते, एका विशिष्ट विक्रेत्याला फायदा व्हावा, यासाठी केलेल्या कराराचा हा परिणाम आहे.
ही एक फसवणूक आहे आणि ज्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण चुकीच्या पद्धतीने मोजले गेले आहेत, तो या फसवणुकीचा बळी आहे. धर्मेंद्र प्रधान आपल्या पदावर कायम आहेत. मोदींचे मौन आता केवळ उदासीनता राहिलेली नाही; ते या गुन्ह्यातील त्यांच्या सहभागाचे द्योतक आहे. जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंद्यात बदलले जाते, तेव्हा चुका सुधारल्या जात नाहीत. त्या अधिकच वाढतात आणि याची अंतिम किंमत आपली मुले मोजत आहेत.
पुनर्मूल्यांकन
शुल्कावरही प्रश्न
राहुल गांधी यांनी उत्तरपत्रिका तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी आकारल्या जाणा-या शुल्काबाबत केंद्र सरकार आणि सीबीएसई बोर्डावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खिसेकापूंपासून सावध रहा. आज तो सीबीएसईच्या आत बसला आहे. सीबीएसईच्या चुकीमुळे तुमचे गुण चुकले तर मुलाला एका बिलासाठी, एका बरोबर उत्तरपत्रिकेसाठी २ हजारांपर्यंत पैसे द्यावे लागू शकतात. यात मुलांना शिक्षा आणि सरकारची कमाई होत आहे, असा आरोप केला.
















