मुंबई : प्रतिनिधी
देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना भेटायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ नाही, मात्र फुटून गेलेल्या गद्दार खासदारांना भेटायला त्यांच्याकडे वेळ आहे. गद्दारांना ‘मी पाठीशी आहे’ असे सांगून मोदींनी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयालाच धमकीवजा संदेश दिल्याची टीका केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जगभरात आणि देशात ‘झेनझी’ पिढीने सरकारला कसे गुडघ्यावर आणले आहे, याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, अत्याचार झाले, ज्यामुळे जालियानवाला बाग हत्याकांडाची आठवण आली. तरीही या विद्यार्थ्यांशी कुणीही संवाद साधत नाही. पंतप्रधान मोदी त्यांना भेटत नाहीत, मात्र रात्री इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकतात. आता यांची इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे. कोरोनाकाळात जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो, तेव्हा हेच लोक मला ट्रोल करत होते.
काल पंतप्रधान मोदी आणि शिंदे गटाच्या खासदारांमध्ये झालेल्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, देशातल्या तरुणांना भेटायला यांना वेळ नाही, मात्र गद्दारांना भेटायला वेळ आहे. बंद दाराआड मोदींनी या खासदारांना सांगितले की, भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मग हे वाक्य बंद दारातून बाहेर कसे आले? हा थेट सर्वोच्च न्यायालयाला किंवा सरकारला दिलेला धमकीवजा संदेश आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे.
गद्दारीचा व्हायरस लोकशाहीचा जीव घेतोय
ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, असे नमूद करत ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी अशा प्रकारे पाठिंबा देऊन भविष्यातील गद्दारांनाही एक चुकीचा संदेश दिला आहे. सध्या राजकारणात मतलबी वारे वाहत असून, हा गद्दारीचा व्हायरस आता लोकशाहीचा जीव घेत आहे. गद्दारांना आता कसले भय? माझ्या मनातील शंका आणि भीती मांडण्यासाठी मी आज समोर आलो आहे.
शिवसेना अपात्रता प्रकरणावर सूचक भाष्य
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेच्या अपात्रता प्रकरणावर बोलणे मात्र ठाकरेंनी टाळले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर आता बोलणार नाही. मात्र, संविधानाप्रमाणेच याचा निकाल लागावा, अशी आमची अपेक्षा आहे असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
















